रणजित मस्के, प्रतिनिधी
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि वेस्पा दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी पथकाला विशेष सूचना देऊन कारवाईचे नियोजन केले.
सोमवारी (१५ जून) गोपनीय माहितीच्या आधारे कोरेगाव-सातारा मार्गावरील महागाव परिसरात सापळा रचण्यात आला. एका व्यक्तीकडे विक्रीसाठी देशी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने राजधानी हॉटेल शेजारील पैलवान पानशॉपसमोर नजर ठेवली. काही वेळात काळ्या रंगाच्या एमएच-११-डीआर-०९८१ क्रमांकाच्या वेस्पा दुचाकीवर आलेल्या संशयिताला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल (मॅगझीनसह), एक जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), ७ आणि २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातिर, पोलीस हवालदार राजू मुलाणी, अतीष घाडगे, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, महेश निर्मळ आणि इरफान मुलाणी यांनी सहभाग घेतला.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.


