पिंपरी प्रतिनिधी
पोलिसांच्या पथकावर गोळीबार करून फरार झालेल्या आणि राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ७० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली. शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
दिघी परिसरात झालेल्या गोळीबार आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात शेखर जाधव हा मुख्य आरोपी होता. या घटनेनंतर तो आपल्या साथीदारांसह फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली होती. दरम्यान, तो आणि त्याचा साथीदार मुस्तफा उर्फ भाईजान हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच शेखर जाधव आणि त्याच्या साथीदारांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले. या धाडसी प्रकारामुळे पोलिसांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध अधिक तीव्र केला.
तपासादरम्यान रविवारी (१४ जून) सायंकाळी शेखर जाधव हा दिघीतील मोझे शाळेसमोरील मोकळ्या मैदानात येणार असल्याची गोपनीय माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरात सापळा रचला. आरोपी घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी त्याला वेढा घालून शिताफीने ताब्यात घेतले.
अटकेनंतर आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याच्याविरोधात राज्यातील विविध भागांतील पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे ७० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर गोळीबाराशी संबंधित दोन गंभीर गुन्ह्यांचीही नोंद आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, शेखर जाधव हा अनेक वर्षांपासून मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांमधील त्याचा सहभाग तपास यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरत होता. पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात यश आले.
ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.
दरम्यान, आरोपीच्या अटकेमुळे दिघी गोळीबार प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपीकडून आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.


