स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबईतील खार पोलिसांनी तब्बल १९ वर्षांपासून पोलिसांना आणि न्यायालयाला गुंगारा देणाऱ्या एका फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हनिफ मुराद फकीर (वय ४२, रा. मोरी रोड, माहिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
आरोपी हनिफ मुराद फकीर याच्यावर सन २००७ मध्ये खार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा (गु.र.क्र. ८४/२००७, कलम ३७९, ३४ भारतीय दंड विधान) दाखल होता. या प्रकरणाची सुनावणी वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ९ व्या न्यायालयात सुरू होती. मात्र, आरोपी वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जाहीरनामा (क्र. १२९४/२०२३, दि. ३०/०६/२०२३) काढला होता. तेव्हापासून आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता.
अशी केली कारवाई
खार पोलीस ठाण्याचे विशेष निगराणी व तडीपार पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस उपनिरीक्षक भिमराव धापटे यांना आरोपी हनिफ फकीर माहिम दर्गा परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने त्वरित माहिम दर्गा परिसरात सापळा रचला. ७ जून २०२६ रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी अत्यंत शिताफीने हनिफला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याला अटक केली.
कारवाईत सहभागी पथक
ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खार पोलीस ठाण्याच्या विशेष निगराणी व तडीपार पथकाने केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भिमराव धापटे, पोलीस हवालदार गुरव, पोलीस हवालदार पोफळे, पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार माने आणि पोलीस शिपाई ठोंबरे यांनी मोलाची भूमिका बजावली.


