मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मालाडमधील अप्पापाडा परिसरात भरदिवसा घडलेल्या चाकू हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका तरुणाने चौघांवर जीवघेणा हल्ला करत सपासप चाकूचे वार केले. या हल्ल्यात आकाश धोत्रे (वय २८) याचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अप्पापाडा परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने रस्त्यात चौघांना गाठत त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी आकाश धोत्रे याचा अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित तिघांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून हल्ल्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मृत आकाश धोत्रे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, जखमी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.


