कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहराचे माजी पोलिस उपअधीक्षक तथा राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक ५, दौंडचे समादेशक अपर पोलिस अधीक्षक तुषार प्रभाकर पाटील (वय ४५) यांचे शनिवारी (७ जून) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटील यांच्या अकाली निधनाने पोलिस दलासह प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांनी स्वतःची किडनी दान करून मुलाला नवजीवन दिले होते. प्रत्यारोपणानंतरही त्यांनी सेवेत सक्रिय राहून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या.
मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक रक्ताची उलटी झाल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि ते कोमात गेले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. शनिवारी सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
कोल्हापूरशी जुळलेले विशेष नाते
पाटील यांनी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर २००४ मध्ये कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांशी सुसंवाद साधणारे अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती.
यानंतर त्यांनी रत्नागिरी येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले. विविध संवेदनशील पदांवर काम करताना त्यांनी प्रशासकीय कौशल्य आणि नेतृत्वगुणांची छाप पाडली. काही महिन्यांपूर्वी ते नागरी हक्क संरक्षण विभागात (पीसीआर) अधीक्षक म्हणून कोल्हापुरात रुजू झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्यांची दौंड येथे एसआरपीएफ गट क्रमांक ५ च्या समादेशकपदी बदली झाली होती.
त्यांच्या पत्नी शिल्पा नाईक या कोल्हापूर महानगरपालिकेत सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे पाटील कुटुंबाचा कोल्हापूरशी विशेष संबंध राहिला.
पोलिस दलात शोककळा
तुषार पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी शिल्पा आणि मुलगा संकेत असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
तुषार पाटील यांच्यावर सोमवारी (८ जून) सकाळी त्यांच्या मूळ गावी जामनेर (जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.
कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणारा अधिकारी, गंभीर आजाराशी धैर्याने सामना करणारा योद्धा आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले तुषार पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलाने एक सक्षम अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.


