कोल्हापूर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीत यंदा एक आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. रुपेरी पडद्यावर झळकणारे नामांकित कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर सेलिब्रिटी सदस्य मतदान प्रक्रियेपासून मोठ्या प्रमाणात दूर राहिल्याचे दिसून आले. त्याउलट पडद्यामागील तंत्रज्ञ, कामगार, कलावंत आणि चित्रपट क्षेत्रातील विविध घटकांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. मात्र एकूण मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी राहिली असून राज्यभरातील ३४०३ मतदारांपैकी १६९८ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी केवळ ४९.९० टक्के इतकी नोंदवली गेली.
दशकभरानंतर महामंडळाच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगला असल्याने चित्रपटसृष्टीतील अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. १७ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित १४ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
दोन पॅनलमध्ये थेट लढत
मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल आणि सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनल यांच्यात मुख्य सामना रंगला. याशिवाय १६ अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीत उडी घेतल्याने समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली. विविध गटांच्या प्रचारामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
रविवारी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूरसह राज्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच अनेक सदस्यांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली. विशेषतः तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कलाकारांचा उत्साह लक्षणीय होता.
कोल्हापूरमध्ये सर्वाधिक प्रतिसाद
मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर केंद्राने आघाडी घेतली. कोल्हापूरमधील ७४६ मतदारांपैकी ५१७ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे येथे सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
केंद्रनिहाय मतदानाचा तपशील पुढीलप्रमाणे :
केंद्र एकूण मतदार मतदान टक्केवारी
कोल्हापूर ७४६ ५१७ ६९.३०%
पुणे ७२४ ४६० ६३.५४%
मुंबई १५६९ ५३९ ३४.३५%
नाशिक २१९ ११९ ५४.३४%
सोलापूर १४६ ६३ ४३.१५%
विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचे प्रमुख केंद्र मानल्या जाणाऱ्या मुंबईत मतदानाचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी राहिला. अनेक नामवंत सदस्यांनी मतदानाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा दिवसभर रंगली.
मतदान केंद्रांवर उत्साहाचे वातावरण
कोल्हापूरमधील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. दोन्ही प्रमुख पॅनल्सने मतदान केंद्राबाहेर स्वतंत्र बूथ उभारले होते. तेथे कार्यकर्ते मतदारांची नावे शोधून देणे, मतदान प्रक्रियेबाबत माहिती देणे यासाठी मदत करत होते.
मतदान केंद्र परिसरात समर्थकांची मोठी गर्दी असली तरी कोणताही वाद किंवा गोंधळ निर्माण झाला नाही. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आज होणार मतमोजणी
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सोमवारी सकाळी ९ वाजता कोल्हापूर येथील राम गणेश गडकरी सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी ८ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे ७० अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते. मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडल्याचा दावा निवडणूक प्रशासनाने केला आहे.
निकालाकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष
दहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीमुळे महामंडळाच्या भावी नेतृत्वाची दिशा ठरणार आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेच्या कारभारावर पुढील काही वर्षांसाठी कोणाचे वर्चस्व राहणार, याचा फैसला आजच्या मतमोजणीत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.


