नवी मुंबई प्रतिनिधी
महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने बुधवारी नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्राबाहेर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बेरोजगारी आणि महागाईने सामान्य माणसाचं जगणं कठीण झालं असून याबाबत झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नवी मुंबईत प्रतिकात्मकरित्या रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं आणि सामान्य माणसाच्या दररोजच्या जगण्याच्या लढाईकडं… pic.twitter.com/TIJYz0Ji2H
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2026
आंदोलकांनी चूल मांडून तसेच भांडी वाजवत केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सिडको एक्झिबिशन सेंटर परिसरात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा रोखण्यात आल्यानंतर आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आले. त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या वेळी रोहिणी खडसे यांना पोलिसांनी उचलून नेत असल्याचे दृश्यही पाहायला मिळाले.
आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केला. “महाराष्ट्रात आंदोलन करण्याची परवानगीच उरलेली नाही. लोकप्रतिनिधींना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेणे चुकीचे असून लोकशाही मूल्यांना धरून नाही,” असे ते म्हणाले. वाढती महागाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधत केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. देशाची आर्थिक स्थिती चिंताजनक होत असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सरकारची कर्जमाफी योजना अनेक अटींनी ग्रासलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, सरकारविरोधातील आवाज दाबला जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
या आंदोलनामुळे सिडको परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना नंतर सोडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


