कल्याण, प्रतिनिधी
कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरात आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या विवाहित मुलीची तिच्याच वडिलांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तीन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी वडिलांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुलीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या गायत्री वसईकर हिने काही काळापूर्वी स्वतःच्या पसंतीने इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तिच्या कुटुंबाचा, विशेषतः वडील विनोद वसईकर यांचा तीव्र विरोध होता. विवाहानंतर गायत्री काही दिवसांसाठी माहेरी आली असताना ही घटना घडली.
घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर घरात गायत्री आणि तिचे वडील यांच्यात विवाहाच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. हा वाद काही वेळातच तीव्र झाला. संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी घरात असलेल्या धारदार शस्त्राने गायत्रीवर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी वडील घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाची सूत्रे हाती घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध ठिकाणी पथके पाठवून शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी विनोद वसईकर यांना अटक केली.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, गायत्रीसाठी कुटुंबाने यापूर्वी दोन वेळा विवाह जुळविण्याचे प्रयत्न केले होते. मात्र तिने ते प्रस्ताव नाकारले होते. त्यानंतर तिने स्वतःच्या पसंतीने प्रेमविवाह केला. याच कारणामुळे आरोपी वडील तिच्यावर नाराज होते. चौकशीदरम्यान मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात असल्यानेच आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.
या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली असून आंतरजातीय विवाहाच्या मुद्द्यावरून घडलेल्या या प्रकारामुळे सामाजिक स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.
दरम्यान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि विवाहाची निवड हा प्रत्येक सज्ञान व्यक्तीचा मूलभूत अधिकार असताना केवळ सामाजिक प्रतिष्ठा किंवा जातीय कारणांमुळे घडणाऱ्या अशा घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


