सातारा प्रतिनिधी
फलटण : स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेत ४ किलो ६९ ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख १ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी जिल्ह्यातील अवैध गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
२९ मे रोजी फलटण येथे कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन जण बजाज प्लॅटिना (एमएच १२ एचएक्स २६४९) या मोटारसायकलवरून धुळदेव गाव हद्दीतील रावरामोशी पुलाजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे सापळा रचून छापा टाकला. यावेळी दोघांकडून पिशवीत ठेवलेला ४ किलो ६९ ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला. हा माल पुढील तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस हवालदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजय जाधव, जयवंत खांडके, अमित झेंडे, नवनाथ कदम, अजित कर्णे, अमित सपकाळ, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, प्रविण पवार, संकेत निकम, विजय निकम, आनंदा भोये तसेच पोलीस हवालदार रुक्मिणी माने, बापूराव धायगुडे, निखिल गायकवाड, गणेश आवघडे आणि अतुल बडे यांनी सहभाग घेतला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पथकाचे अभिनंदन केले.


