विटा प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील विटा शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला असून, पतीची शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी एका महिलेला नरबळीचा सल्ला देणाऱ्या तिघा भोंदू बाबांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली सामान्य नागरिकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टोळीविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणात महेश बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत निकम (रा. घोगाव, ता. पलूस, सध्या रा. भवानी माळ, विटा) आणि सूरज उपाध्याय (रा. विटा, ता. खानापूर) यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांनाही सोमवार, दि. २५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महिला पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
देवांचा संचार असल्याचा दावा; श्रद्धेचा गैरफायदा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी एका विवाहित महिलेला आणि तिच्या पतीला लक्ष्य करत त्यांच्या कौटुंबिक अडचणी व शारीरिक व्याधीवर उपाय असल्याचे सांगून विश्वासात घेतले. संकेत निकम याच्या अंगात दत्तगुरू, शंकर महाराज, चिलेबाबा, कालभैरव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा संचार होत असल्याचा दावा या तिघांकडून करण्यात येत होता.
“दैवी शक्तीच्या माध्यमातून सर्व संकटे दूर करता येतात,” असे सांगत त्यांनी संबंधित दाम्पत्याला विविध पूजा, हवन, विशेष विधी आणि तथाकथित आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली जाळ्यात ओढले. यानंतर या प्रकरणाने अत्यंत गंभीर वळण घेत नरबळीचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
नरबळी, गर्भपात आणि गूढ विधींचा दबाव
दि. १ मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत विटा येथील पाटील वस्ती परिसरात तसेच संबंधित महिलेच्या घरी वारंवार वेगवेगळे धार्मिक विधी करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
पतीची शारीरिक व्याधी कायमची दूर करण्यासाठी “विशेष बळी” देणे आवश्यक असल्याचे सांगत संशयितांनी नरबळीचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर गर्भपातासंदर्भातही महिलेला दिशाभूल करणारे सल्ले देण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, राज्यात अद्यापही अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
कडेश्वर धाम मठाची पोलिसांकडून चौकशी
या तिघांची भोंदूगिरी विटा येथील पाटील वस्ती परिसरातील “कडेश्वर धाम अध्यात्म संस्था” या मठातून सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी या मठाची सखोल चौकशी सुरू केली असून, येथे आणखी कोणकोणत्या प्रकारचे विधी किंवा आर्थिक व्यवहार सुरू होते का, याचाही तपास केला जात आहे.
मठात येणाऱ्या भाविकांची माहिती, आर्थिक व्यवहार, कथित धार्मिक कार्यक्रम आणि संशयितांशी संबंधित इतर व्यक्तींची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत कारवाईची शक्यता
या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. नरबळी, भूतबाधा, देवाचा संचार, चमत्काराच्या नावाखाली फसवणूक आणि मानसिक छळ यांसारख्या प्रकारांवर या कायद्यात कठोर तरतुदी आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे विटा शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारचे चमत्कार, देवसंचार किंवा गुप्त विधींच्या नावाखाली फसवणूक होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


