सांगोला प्रतिनिधी
जनगणनेसारखे महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असताना सांगोल्यातील एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. राजाराम दामोदर ढोले (वय ४९) असे मृत शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या निधनामुळे सांगोला तालुक्यात शोककळा पसरली आहे.
राजाराम ढोले हे सांगोल्यातील विद्यामंदिर प्रशालेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. शासनाच्या जनगणना मोहिमेसाठी त्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या दरम्यान ढोले हे सांगोला शहरालगतच्या गावडे वस्ती परिसरात नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम करत होते. घराघरांत जाऊन माहिती नोंदवित असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच ते खाली कोसळले.
स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
या घटनेची माहिती समोर येताच शिक्षकवर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रशासनात हळहळ व्यक्त करण्यात आली. राष्ट्रीय जबाबदारी पार पाडताना एका शिक्षकाला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
राजाराम ढोले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून, अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, जनगणनेसारख्या व्यापक मोहिमेत कार्यरत कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण आणि आरोग्याच्या समस्या याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शिक्षक संघटनांकडूनही ढोले यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत व विशेष सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


