नवी दिल्ली वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अचानक चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’भोवती आता नवे राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाले आहेत. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वतःलाच अटकेची भीती वाटत असल्याचे सांगितल्याने या प्रकरणाने आणखी वेग घेतला आहे. “दिल्ली विमानतळावर उतरताच पोलीस मला तिहार तुरुंगात घेऊन जातील,” अशी भीती त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा विषय प्रचंड चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर या पक्षाच्या अधिकृत हँडलने फॉलोअर्सच्या संख्येत देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या भारतीय जनता पक्ष ला मागे टाकल्याचा दावा करण्यात आला. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरदेखील या पक्षाचे खाते मोठ्या वेगाने लोकप्रिय होत होते. मात्र, गुरुवारी भारतात हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर आली.
अभिजीत दीपके यांनी स्वतः एक्सवर पॉप-अपचा स्क्रीनशॉट शेअर करत “अपेक्षेप्रमाणे भारतात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अकाउंट ब्लॉक करण्यात आले,” असे म्हटले. त्यांनी असा आरोपही केला की, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सोशल मीडिया खात्यांना हॅक करण्याचे प्रयत्न सुरू होते. “सरकारची ही चाल उलटली आहे,” असा दावा त्यांनी केला.
विशेष म्हणजे, मूळ अकाऊंटवर बंदी आल्यानंतर लगेचच कॉकरोच इन बॅक ‘Cockroach Is Back’ नावाने दुसरे हँडल सुरू करण्यात आले. काही तासांतच या नव्या खात्याला हजारो फॉलोअर्स मिळाल्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा या पक्षाची चर्चा रंगली. दुपारी साडेतीनच्या सुमारास या नव्या हँडलचे फॉलोअर्स १६ हजारांहून अधिक झाल्याची माहिती समोर आली.
एका मुलाखतीत बोलताना अभिजीत दीपके यांनी भावनिक प्रतिक्रिया देत म्हटले, “आम्हाला अखेर या देशात आमची ओळख समजली आहे. आमच्याकडे झुरळांसारखे पाहिले जाते.” इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स वाढल्याबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फॉलोअर्स वाढल्याने मला आनंद होत नाही. त्याने वास्तव बदलत नाही. प्रश्न आणि मुद्दे तसेच राहतात.”
३० वर्षीय अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांनी पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी, Boston University मधून जनसंपर्क विषयात पदवी प्राप्त केली. भारतात असताना ते डिजिटल राजकीय प्रचार, ऑनलाइन मोहिमा आणि कथानक निर्मिती या क्षेत्रात कार्यरत होते. सोशल मीडिया रणनीतीकार म्हणून त्यांनी अनेक राजकीय मोहिमांमध्ये काम केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. काही जण याकडे सत्ताविरोधी डिजिटल आंदोलन म्हणून पाहत आहेत, तर काहींच्या मते हा सोशल मीडिया ट्रेंड आणि व्यंगात्मक राजकीय प्रयोग आहे. मात्र, खाते ब्लॉक होणे, अटकेची भीती आणि सोशल मीडियावरील वाढती लोकप्रियता यामुळे हा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.


