नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वर्ष २०२७ मधील विविध स्पर्धा परीक्षा व भरती चाचण्यांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले असून, नागरी सेवा, अभियांत्रिकी, वैद्यकीय सेवा तसेच संरक्षण दलातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा स्पष्ट करण्यात आल्या आहेत. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकामुळे लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
आयोगाच्या वेळापत्रकानुसार, देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षा (Civil Services Preliminary Examination) आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा (Indian Forest Service Preliminary Examination) या संयुक्तपणे २३ मे २०२७ रोजी होणार आहेत. या परीक्षांसाठी अधिसूचना १३ जानेवारी २०२७ रोजी प्रसिद्ध होईल, तर अर्ज करण्याची अंतिम मुदत २ फेब्रुवारी २०२७ निश्चित करण्यात आली आहे.
नागरी सेवा मुख्य परीक्षा २० ऑगस्ट २०२७ पासून सुरू होणार असून ती पाच दिवस चालणार आहे. भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा २१ नोव्हेंबर २०२७ पासून सात दिवसांच्या कालावधीत घेण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी व भू-वैज्ञानिक परीक्षांमध्ये ‘कम्बाइंड जिओ-सायंटिस्ट (प्रिलिमिनरी)’ परीक्षा १० जानेवारी २०२७ रोजी, तर ‘इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (प्रिलिमिनरी)’ परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या मुख्य परीक्षा अनुक्रमे १९ जून आणि १८ जून २०२७ रोजी होतील.
संरक्षण क्षेत्रातील परीक्षा वेळापत्रकानुसार, ‘एनडीए आणि एनए परीक्षा (I)’ तसेच ‘सीडीएस परीक्षा (I)’ या ११ एप्रिल २०२७ रोजी घेण्यात येतील. तर ‘एनडीए आणि एनए परीक्षा (II)’ व ‘सीडीएस परीक्षा (II)’ यांचे आयोजन १९ सप्टेंबर २०२७ रोजी केले जाणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट (CAPF-ACs) परीक्षा ४ जुलै २०२७ रोजी होणार असून, अर्ज प्रक्रिया १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२७ या कालावधीत सुरू राहील.
वैद्यकीय आणि सांख्यिकी सेवा परीक्षांमध्ये ‘कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस (CMS)’ परीक्षा १८ जुलै २०२७ रोजी घेतली जाणार आहे. तसेच ‘आयईएस/आयएसएस’ परीक्षा १८ जून २०२७ पासून सलग तीन दिवस चालेल.
आयोगाने विभागीय स्पर्धा परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ‘CBI (DSP) LDCE’ परीक्षा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी, ‘CISF AC(EXE) LDCE’ परीक्षा १४ मार्च २०२७ रोजी, तर ‘S.O./Steno LDCE’ परीक्षा १८ डिसेंबर २०२७ रोजी होणार आहे. याशिवाय वर्षभरातील विविध भरती चाचण्यांसाठी काही शनिवार-रविवारच्या तारखा राखीव ठेवण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
परीक्षांच्या तारखा आणि कालावधीत परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात, असे आयोगाने नमूद केले आहे. उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना, पात्रता निकष आणि संभाव्य बदलांची माहिती मिळविण्यासाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


