मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर भागात सुरू असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक, पोलिस लाठीचार्ज आणि त्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बुधवारी तडकाफडकी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत, “पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुरू असलेल्या नियमित कारवाईला जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा घाणेरडा प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघाती आरोप केला.
गेल्या दोन दिवसांपासून वांद्रे पूर्व परिसरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. गरीब नगर आणि आसपासच्या भागातील काही झोपड्या आणि बांधकामांवर कारवाई करण्यात येत असताना रहिवाशांमध्ये संताप उसळला. दुसऱ्या दिवशी परिस्थिती अधिक चिघळली आणि काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर हा मुद्दा राजकीय पातळीवरही तापला आहे.
“हिंदू-मुस्लिम नरेटीव्ह तयार करण्याचा प्रयत्न”
पत्रकार परिषदेत बोलताना वरुण सरदेसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. “रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत माहिती दिली होती. ही कारवाई पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि रेल्वे परिसर मोकळा करण्यासाठी सुरू होती. मात्र, प्रत्येक गोष्टीत राजकारण करून त्याला हिंदू-मुस्लिम नरेटीव्ह देण्याची भाजपची जुनी स्ट्रॅटर्जी आहे,” असे ते म्हणाले.
सरदेसाई यांनी आरोप केला की, सोशल मीडियावरून शिवसेना ठाकरे गटाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “मुंबईत भाजपचा महापौर असल्यामुळेच ही कारवाई झाली, मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशाने घरे तोडण्यात आली, शिवसेनेला आणि मला याचा धक्का बसला, अशा प्रकारचे खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ दररोज व्हायरल केले जात आहेत,” असा दावा त्यांनी केला.
त्यांनी स्पष्ट केले की, “मुंबईत रस्ते रुंदीकरण, नालेसफाई, एसआरए प्रकल्प किंवा रेल्वे विकासासाठी अशा प्रकारच्या निष्कासनाच्या कारवाया सातत्याने होत असतात. शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी त्या आवश्यक असतात. आमचा विकासाला अजिबात विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली लोकांना लक्ष्य करून त्याला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे.”
२०२१ च्या सर्वेक्षणावरून नवा वाद
या प्रकरणाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सरदेसाई यांनी २०२१ मध्ये रेल्वेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते, उच्च न्यायालयाने यापूर्वी आदेश देत ज्या घरांचे सर्वेक्षण झाले आहे, त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गरीब नगर परिसरातील अनेक रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झालेच नसल्याचा दावा त्यांनी केला.
“स्थानिक नागरिकांनी आम्हाला सांगितले की, २०२१ मध्ये संपूर्ण घरांचा सर्वे झाला नव्हता. तत्कालीन आमदारांची जबाबदारी होती की त्यांनी हा सर्वे व्यवस्थित पूर्ण करून घ्यायला हवा होता. मात्र निष्क्रियतेमुळे हे काम रखडले आणि आता त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
सरदेसाई यांनी सांगितले की, ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांची भेट घेऊन नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. “ज्यांचे कागदपत्रे वैध आहेत, त्यांचे हक्क सुरक्षित राहावेत, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
‘SATIS’ प्रकल्पाचा उल्लेख
वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वाढती गर्दी, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता त्या परिसराचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले. “विधानसभा निवडणुकीच्या काळात मी वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ आणि सुटसुटीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने ‘सॅटीस’ (SATIS) प्रकल्प राबवण्यासाठी मी नुकतीच वरिष्ठ अधिकारी अश्विनी भिडे यांची भेट घेतली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, रेल्वे परिसरातील विकासकामे आणि स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन या दोन्ही गोष्टी समांतरपणे होणे आवश्यक आहे. “विकासाच्या नावाखाली लोकांना बेघर करणे हा उद्देश नसून, नियोजनबद्ध विकास करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे,” असेही ते म्हणाले.
किरीट सोमय्यांवर थेट हल्लाबोल
पत्रकार परिषदेत सरदेसाई यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांच्यावरही जोरदार टीका केली. भाजपकडून गरीब नगर परिसरातील काही रहिवाशांना “बांगलादेशी घुसखोर” म्हणून संबोधले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सवाल उपस्थित केला.
“जर भाजपच्या दाव्यानुसार हे लोक बांगलादेशी होते आणि आता त्यांची घरे तोडण्यात आली, तर हे लोक आता कुठे गेले? त्यांची जबाबदारी कोण घेणार? किरीट सोमय्या आता त्यांना शोधणार आहेत का?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सरदेसाई पुढे म्हणाले, “एवढा सरळ आणि प्रशासकीय स्वरूपाचा विषय असताना त्याचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी भाजप केवळ राजकारण करत आहे.”
परिसरात तणाव कायम
दरम्यान, वांद्रे पूर्व परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम नियोजित विकास आराखड्याचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण कायम आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे आगामी काळात मुंबईतील अतिक्रमण कारवाया, पुनर्वसनाचा प्रश्न आणि त्याभोवतीचे राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.


