भोपाळ:
मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील उच्चभ्रू कटारा हिल्स परिसरात घडलेल्या ३१ वर्षीय ट्विशा शर्माच्या संशयास्पद मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. मिस पुणे किताब पटकावणारी, नामांकित जर्मन कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेली आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे आत्मनिर्भर असलेली ट्विशा लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत मृत अवस्थेत आढळून आल्यानं या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
घरगुती हिंसाचार, मानसिक छळ, पैशांसाठी दबाव आणि संभाव्य हत्येच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनलं आहे. ट्विशाच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी केल्यानंतर अखेर विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं आहे.
कोण होती ट्विशा शर्मा?
ट्विशा शर्मा ही मूळची उत्तर प्रदेशातील नोएडाची रहिवासी होती. शिक्षणात हुशार असलेल्या ट्विशाने एमबीएचे शिक्षण पूर्ण केलं होतं. करिअरसोबतच तिला कला, फॅशन आणि मनोरंजन क्षेत्राचीही विशेष आवड होती.
२००९-२०१० दरम्यान तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली. तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि आत्मविश्वासामुळे तिने ‘मिस पुणे’ सौंदर्य स्पर्धेचा किताब जिंकला होता.
ग्लॅमर विश्वात यश मिळवल्यानंतर ट्विशाने कॉर्पोरेट क्षेत्राकडे मोर्चा वळवला. एका नामांकित जर्मन कंपनीत ती वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. उच्च पगार, स्वतंत्र विचारसरणी आणि स्वतःच्या बळावर उभं केलेलं करिअर यामुळे ट्विशा अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान मानली जात होती.
लग्नानंतर आयुष्यात बदल
डिसेंबर २०२५मध्ये ट्विशाने भोपाळमधील वकील समर्थ सिंह याच्याशी विवाह केला. समर्थ सिंह याची आई निवृत्त न्यायाधीश असल्याने हे कुटुंब उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित मानलं जात होतं. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचं दिसत होतं.
मात्र, काही महिन्यांतच ट्विशाच्या आयुष्यात तणाव वाढू लागल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागण्या, मानसिक दबाव आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१२ मे रोजी धक्कादायक घटना
१२ मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स येथील पतीच्या घरी ट्विशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला. सुरुवातीला आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
भोपाळ एम्सने दिलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण “अँटीमॉर्टम हँगिंग” म्हणजे जिवंतपणी गळफास घेतल्याचं नमूद करण्यात आलं. मात्र, तिच्या शरीरावर आढळलेल्या जखमांच्या खुणांमुळे संशय अधिक गडद झाला आहे.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
ट्विशाच्या कुटुंबियांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्विशावर सातत्याने पैशांसाठी दबाव टाकण्यात येत होता. तिने ती गर्भवती असल्याची माहिती दिल्यानंतरही तिला आधार देण्याऐवजी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, ट्विशाला आधी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर तिचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवण्यात आला असावा. घटनास्थळावरून गळफासासाठी वापरण्यात आलेलं साहित्य तत्काळ जप्त न केल्यानेही तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
SIT चौकशी सुरू
या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा निर्माण झाली आहे. ट्विशाच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आंदोलन करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
सध्या पोलिसांकडून ट्विशाच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स, आर्थिक व्यवहार आणि विवाहानंतरच्या घटनांची तपशीलवार चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरही ट्विशासाठी न्यायाची मागणी जोर धरत असून “Justice for Twisha” हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. उच्चभ्रू कुटुंबातील चमकदार आयुष्याच्या आड दडलेलं घरगुती हिंसाचाराचं भयावह वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलं आहे.


