रणजित मस्के, प्रतिनिधी
लग्न समारंभासाठी आलेल्या एका महिलेचे रिक्षा प्रवासादरम्यान हरवलेले साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने शोधून काढण्यात बदलापूर पश्चिम पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही वेळातच या साडेसात लाख रुपये किमतीच्या दागिन्यांचा शोध लावून ते संबंधित महिला प्रवाशाला परत केले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईतील वांद्रे येथे राहणाऱ्या सविता वसंत राठोड या १४ मे रोजी बदलापूर पश्चिम येथील पाटील हॉल येथे आयोजित एका लग्न समारंभासाठी आल्या होत्या. बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानक ते पाटील हॉल दरम्यान त्यांनी रिक्षाने प्रवास केला. मात्र हॉलवर पोहोचल्यानंतर रिक्षातून उतरताना त्यांचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रिक्षातच गळून पडले. दागिने हरविल्याचे लक्षात येताच राठोड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार बाळनोठ आणि पोलीस हवालदार जिरे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी रेल्वे स्थानक ते पाटील हॉल दरम्यानच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींचा अत्यंत बारकाईने तपास केला. या तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी काही वेळातच संबंधित रिक्षाचा शोध लावून त्यातील अंदाजे साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सुखरूप हस्तगत केले.
आपले हक्काचे दागिने सुरक्षित परत मिळाल्याने सविता राठोड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.


