रणजित मस्के, प्रतिनिधी
पालघर : बोईसर परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावण्याचा प्रयत्न करून धारदार हत्याराने गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. भगवान शांताराम चव्हाण (वय ४०, रा. सालवड, बोईसर, मूळ रा. आजोंदे, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी पूजा दक्षीला मखवाना (वय २८) या त्यांच्या राहत्या इमारतीखाली कुत्र्यांना चपाती देऊन पुन्हा घरी जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील धारदार हत्याराने तिच्यावर वार केला. वार चुकवण्याच्या प्रयत्नात तो तिच्या नाकावर लागल्याने ती जखमी झाली. महिलेच्या आरडाओरडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून १६ मे रोजी बोईसर सालवड परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने आरोपीला २० मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोलीस हवालदार विजय दुबळा, पोलीस हवालदार जयराम चौधरी, पोलीस हवालदार सचिन जाधव, पोलीस नाईक योगेश गावित, पोलीस अंमलदार गणेश व्हसकोटी, पोलीस अंमलदार मयुर पाटील, पोलीस अंमलदार धीरज साळुंखे, पोलीस अंमलदार देवेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र घुगे, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे आणि पोलीस अंमलदार रोहित पाटील यांनी केली.


