सातारा प्रतिनिधी
साताऱ्यातील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत मोठा वाद निर्माण झाला. सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील बहुचर्चित अंतिम सामना अवघ्या १८ सेकंदांत संपला. मात्र या सामन्यानंतर आखाड्यात निर्माण झालेला तणाव, धमक्या आणि गोंधळ यामुळे हिंदकेसरी स्पर्धेची चर्चा राज्यभर रंगली आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच महेंद्र गायकवाड आक्रमक पवित्र्यात दिसून आला. पंचांनी शिट्टी वाजवताच महेंद्रने झपाट्याने हल्ला चढवत पृथ्वीराजवर दबाव निर्माण केला. पृथ्वीराज बचावात्मक खेळ करत असतानाच महेंद्रने वेगवान डाव टाकत दोन गुण मिळवले. त्यानंतर पुढील पकडीसाठी प्रयत्न करताना महेंद्रने पृथ्वीराजचा हात जोरात पिळल्याचे दिसून आले. याचवेळी पृथ्वीराजच्या हातातून आवाज आल्याने मैदानावरील वातावरण क्षणात गंभीर झाले.
पंचांनी तत्काळ सामना थांबवत डॉक्टरांना मैदानात बोलावले. तपासणीत पृथ्वीराजचा हात गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. वेदनेने त्रस्त झालेल्या पृथ्वीराजला सामना पुढे खेळणे शक्य नसल्याने त्याला माघार घ्यावी लागली. परिणामी २-० अशा गुणांनी महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले आणि प्रतिष्ठेची हिंदकेसरी गदा त्याच्या नावावर झाली.
“मी मुद्दाम केलं नाही”; महेंद्रची मैदानातच माफी
पृथ्वीराजच्या जखमीनंतर मैदानात उपस्थित प्रशिक्षक, पंच आणि समर्थक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. काही पंचांनी महेंद्रवर आक्रमक खेळाचा आरोप करत त्याला इशारा दिला. त्यानंतर महेंद्र गायकवाडने हात जोडून आपण हा डाव जाणूनबुजून केला नसल्याचे सांगितले. “मी मुद्दाम केलं नाही,” अशी शपथ घेत त्याने पृथ्वीराजची माफी मागितल्याची चर्चा मैदानात रंगली.
मात्र पृथ्वीराजचा संताप काही कमी झाला नाही. डॉक्टर तपासणी करत असताना तो अत्यंत संतप्त अवस्थेत दिसून आला. दोन्ही पैलवानांना दूर करण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली.
“तुला संपवणार… लक्षात ठेव तू”
याचवेळी पृथ्वीराज मोहोळने महेंद्रला उघड धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. काही कॅमेऱ्यांमध्ये त्याचा आवाज कैद झाल्याचे सांगितले जात असून, “आज हारलो… पण तुला संपवणार… लक्षात ठेव तू,” असे शब्द त्याने उच्चारल्याची चर्चा रंगली आहे. या घटनेनंतर काही काळ आखाड्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
महेंद्रला ‘थार’, पृथ्वीराजला ट्रॅक्टर
हिंदकेसरी किताब जिंकणाऱ्या महेंद्र गायकवाडला मानाची चांदीची गदा, रोख पारितोषिक आणि ‘महिंद्रा थार’ गाडी देऊन गौरविण्यात आले. उपविजेता पृथ्वीराज मोहोळ याला ट्रॅक्टर पारितोषिक म्हणून देण्यात आला. मात्र या रंगतदार अंतिम सामन्यापेक्षा त्यानंतरचा वादच अधिक चर्चेचा विषय ठरला आहे.
कुस्तीविश्वात चर्चांना उधाण
महेंद्रचा डाव नियमांच्या चौकटीत होता का, की तो अति आक्रमक होता, यावर आता कुस्तीविश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही माजी पैलवानांनी हा अपघाती प्रकार असल्याचे म्हटले, तर काहींनी अशा धोकादायक पकडींवर नियंत्रण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. हिंदकेसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत घडलेल्या या घटनेमुळे कुस्तीच्या नियमांवर आणि खेळाडूंच्या सुरक्षेवर नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.


