नागपूर प्रतिनिधी
विदर्भात वाढत्या तापमानाने नागरिकांचे अक्षरशः हाल सुरू असताना नागपूर जिल्हा प्रशासनाने उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कठोर आणि व्यापक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वच घटकांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यापासून ते बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना सक्तीची विश्रांती देण्यापर्यंत अनेक निर्देश प्रशासनाने लागू केले आहेत.
नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये तापमान सातत्याने ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने उष्माघात, निर्जलीकरण आणि अन्य आरोग्यविषयक समस्यांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शैक्षणिक संस्था, उद्योग, रुग्णालये आणि वसतिगृहे यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी करत परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोचिंग क्लासेसवर दुपारच्या सत्रात बंदी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सर्व खासगी कोचिंग क्लासेसना आता केवळ सकाळी आणि सायंकाळीच वर्ग घेता येणार आहेत. दुपारी ११ ते सायंकाळी ४.३० या कालावधीत कोणतेही वर्ग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. उन्हाच्या तीव्र झळांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
यासोबतच क्लासेसमध्ये थंड आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था ठेवणे, विद्यार्थ्यांना उष्माघाताची लक्षणे समजावून सांगणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाविद्यालयांना सावधगिरीचे निर्देश
महाविद्यालयांनी शक्यतो दुपारच्या वेळेत परीक्षा आणि नियमित वर्ग टाळावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र पूर्वनियोजित परीक्षा घेणे अपरिहार्य असल्यास परीक्षा केंद्रांमध्ये थंड पिण्याचे पाणी, ओआरएस, पंखे, कुलर आणि हवेशीर व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा हॉलचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.
कामगारांसाठी विशेष संरक्षणात्मक उपाय
उद्योग, कारखाने, खाणी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रशासनाने विशेष नियम लागू केले आहेत. दुपारी ११ ते सायंकाळी ४ या कालावधीत उघड्यावर काम करण्यास मनाई करण्यात आली असून या वेळेत कामगारांना विश्रांती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्या लागल्यास संबंधित आस्थापनांनी कामगारांसाठी सावलीची व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी, ओआरएस आणि प्राथमिक उपचार साहित्य उपलब्ध ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. उष्णतेमुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नयेत, यासाठी श्रम विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वसतिगृहांसाठीही प्रशासनाचे आदेश
विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. वसतिगृहांमध्ये थंड पिण्याचे पाणी, आयव्ही फ्लुइड्स, ओआरएस आणि कुलपॅक उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत खोल्यांमध्ये उष्णता कमी राहील, यासाठी कुलर, पंखे किंवा इतर पर्यायी साधनांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रुग्णालयांना ‘हीट अॅक्शन मोड’वर राहण्याचे आदेश
उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र ‘कोल्ड वॉर्ड’ तयार ठेवणे, औषधसाठा वाढवणे, आयव्ही आणि ओआरएस उपलब्ध ठेवणे, तसेच कुलपॅकची व्यवस्था करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
याशिवाय दररोज उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याची जबाबदारीही रुग्णालयांवर सोपविण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक नोडल अधिकारी
या संपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय साधून उष्णतेच्या संकटावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व विभाग, यंत्रणा, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि खासगी आस्थापनांनी प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


