रणजित मस्के, प्रतिनिधी
ओतूर : पुणे ग्रामीण हद्दीतील वाढते अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने रस्ते सुरक्षा व चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी जनजागृतीपर सूचनाफलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ओतूर पोलीस ठाण्याने जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे.
अपघातप्रवण क्षेत्रे, तीव्र वळणे, घाटरस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच महामार्गांवरील धोकादायक ठिकाणी हे सूचनाफलक लावण्यात येणार असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.
या उपक्रमात पोलीस प्रशासनाने वेग नियंत्रण, हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट लावणे, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा अशा महत्त्वाच्या संदेशांवर भर दिला आहे.
याबाबत बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता वाहनचालकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. हे सूचनाफलक नागरिकांना सतत सुरक्षिततेची आठवण करून देतील.
पोलीस अधिकारी: पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती वाढून अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


