सातारा प्रतिनिधी
साताऱ्याच्या समृद्ध कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर झळाळी देणारा ५२ वा हिंदकेसरी पुरुष व महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांचा महासोहळा येत्या १४ ते १७ मे दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे रंगणार आहे. साताऱ्याचे ज्येष्ठ पैलवान व क्रीडामहर्षी साहेबराव पवार (भाऊ) यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण जिल्ह्यात कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय शैली कुस्ती महासंघ, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती संयोजन समितीचे निमंत्रक दीपक पवार आणि राजेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे तसेच राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलालजी उपस्थित होते.
२२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा मानाचे यजमानपद
हिंदकेसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा साताऱ्यात होत असल्याने जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. साताऱ्याची ऐतिहासिक कुस्ती परंपरा अधोरेखित करताना दीपक पवार यांनी ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव, श्रीरंग अप्पा जाधव, बाबुराव चव्हाण, मारुती वडार, शामराव मुळीक, निजाम पैलवान आणि बळीराम चौकवले यांसारख्या दिग्गज मल्लांच्या परंपरेची आठवण करून दिली.
देशभरातील २८ राज्यांतील मल्लांची उपस्थिती
या स्पर्धेत देशातील २८ राज्यांमधून सुमारे ६०० पुरुष आणि २५० हून अधिक महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील पंच, अधिकारी आणि प्रशिक्षकांचीही उपस्थिती राहणार असून, चार दिवस सातारा शहरात कुस्तीचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत महिला हिंदकेसरी स्पर्धांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तब्बल ३०० महिला मल्ल साताऱ्यात दाखल होणार असून, त्यांच्या निवासाची व्यवस्था यशोदा शिक्षण संस्थेमध्ये करण्यात आली आहे.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची बरसात
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांनी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. पुरुष हिंदकेसरी किताब पटकावणाऱ्या विजेत्यास मोटार, एक किलो चांदीची गदा, ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहन देण्यात येणार आहे.
महिला हिंदकेसरी गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास दुचाकी वाहन, द्वितीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय विविध वजनी गटांतील विजेत्यांनाही मोटार, अॅक्टिव्हा, दुचाकी वाहने आणि रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पाच कोटींचा भव्य कुस्ती सोहळा
या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, साताऱ्याच्या क्रीडा इतिहासातील हा सर्वात मोठा कुस्ती सोहळा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. हिंदकेसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा साताऱ्यात होत असल्याने जिल्ह्यातील नागरिक, कुस्तीप्रेमी आणि क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दीपक पवार आणि सुधीर पवार यांनी केले.
चार दिवस रंगणाऱ्या या कुस्ती महासंग्रामात देशातील नामांकित मल्लांच्या थरारक लढती पाहण्याची संधी साताऱेकरांना मिळणार असून, साताऱ्याची कुस्ती परंपरा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर दिमाखात झळकणार आहे.


