नवी दिल्ली वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेच्या हालचालींना झपाट्याने सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यातील सत्तास्थापनेकरिता केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवडीपासून मंत्रिमंडळाच्या रचनेपर्यंत सर्व सूत्रे आता थेट शहांच्या हाती देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या नव्या सरकारचा भव्य शपथविधी सोहळा ९ मे रोजी कोलकात्यात पार पडणार असून, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरळीत आणि विनाअडथळा पार पडावी यासाठी पक्षाने काटेकोर नियोजन सुरू केले आहे. मोहन माझी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते शहांना सहकार्य करणार आहेत. लवकरच अमित शहा बंगाल दौऱ्यावर जाऊन विधिमंडळ पक्षनेत्याची निवड, मंत्रिमंडळाची आखणी आणि सत्तेची सूत्रे हातात घेण्याच्या प्रक्रियेला अंतिम रूप देणार आहेत.
दरम्यान, ईशान्य भारतातही भाजपने हालचाली वेगात केल्या आहेत. आसाममध्ये सरकार स्थापनेसाठी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सहनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी चुरस; अधिकारी आघाडीवर
मुख्यमंत्रीपदासाठी पक्षांतर्गत चुरस रंगू लागली असून, भाजपचा आक्रमक आणि प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे सुवेंदू अधिकारी हे या शर्यतीत सर्वाधिक आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य, नेत्या अग्निमित्रा पोल तसेच रूपा गांगुली यांचीही नावे चर्चेत आहेत.
एकेकाळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, त्यांनी निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांना दोन वेळा पराभूत करत स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत प्रचाराची धुरा सांभाळली होती.
भाजपचा ‘बंगाल ब्लूप्रिंट’ ठरणार निर्णायक
भाजपच्या या विजयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात कायदा-सुव्यवस्था, उद्योगवाढ, आणि केंद्र-राज्य समन्वय या मुद्द्यांवर नवीन सरकारची कसोटी लागणार आहे.
९ मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यानंतर बंगालमध्ये भाजपच्या ‘नव्या युगाची’ अधिकृत सुरुवात होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


