मुंबई प्रतिनिधी
नीट (यूजी) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उद्या रविवार (३ मे) दिवसा घेतला जाणारा नियमित मेगाब्लॉक रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसभर लोकल सेवा सुरळीत राहणार असली, तरी आवश्यक देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रात्रीच्या सेवांवर मोठा परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गांवर रविवारी रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ या वेळेत पाच तासांचा ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या प्रमुख स्थानकांवरच या गाड्यांना थांबे देण्यात येणार आहेत. घाटकोपरकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप मार्गावरील गाड्यांनाही याच पद्धतीने जलद मार्गावर वळवण्यात येणार असून, निवडक स्थानकांवर थांबे देण्यात येतील.
ब्लॉकपूर्वी डाउन दिशेची शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१६ वाजता सीएसएमटीहून टिटवाळाकडे सुटेल, तर अप दिशेची शेवटची गाडी कल्याणहून रात्री १०.२२ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाराकडे पहिली लोकल रविवारी पहाटे ५.०७ वाजता सुटेल, तर टिटवाळाहून सीएसएमटीकडे पहिली गाडी पहाटे ४.१२ वाजता धावेल.
दरम्यान, ट्रान्स हार्बर मार्गावरही पाच तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ४.४५ या वेळेत दोन्ही दिशेने लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे या कालावधीत काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे.
ब्लॉकपूर्वी ठाणे–पनवेल दरम्यानची शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.१४ वाजता सुटेल, तर वाशीहून ठाण्याकडे जाणारी शेवटची गाडी रात्री १०.४५ वाजता धावेल. ब्लॉकनंतर ठाणेहून पनवेलकडे पहिली सेवा रविवारी पहाटे ५.१२ वाजता सुरू होईल, तर पनवेलहून ठाण्याकडे पहिली लोकल पहाटे ४.३३ वाजता सुटेल.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिवसा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी मध्यरात्रीच्या विशेष ब्लॉकमुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.


