नवी दिल्ली वृत्तसंस्था
आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत केंद्र सरकारने शनिवारी सकाळी ११.४१ वाजता ‘सेल ब्रॉडकास्ट’ आधारित आपत्कालीन इशारा प्रणालीची देशव्यापी चाचणी घेतली. या चाचणीअंतर्गत, मोबाईलवरील संबंधित सेटिंग सुरू असलेल्या लाखो नागरिकांच्या फोनवर “Extremely Severe Alert” असा संदेश मोठ्या आवाजासह प्राप्त झाला. हा केवळ चाचणी संदेश असून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.
दूरसंचार विभागाकडून विकसित करण्यात आलेली ही प्रणाली नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी नागरिकांपर्यंत तात्काळ आणि अचूक माहिती पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पूर, भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी यांसारख्या संकटांमध्ये वेळेवर सूचना मिळाल्यास जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रणालीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ‘सचेत’ (SACHET) या एकात्मिक अलर्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही सेवा कार्यरत करण्यात आली असून, ‘सी-डॉट’ (C-DOT) या संस्थेने ती विकसित केली आहे. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने सुचवलेल्या ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’वर ही प्रणाली आधारित आहे.
ही यंत्रणा सध्या देशातील सर्व ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी हवामान इशारे व नैसर्गिक संकटांच्या वेळी १९ हून अधिक भारतीय भाषांमध्ये अब्जावधी एसएमएस पाठवले आहेत; मात्र नवीन ‘सेल ब्रॉडकास्ट’ तंत्रज्ञान हे पारंपरिक एसएमएसपेक्षा अधिक प्रभावी मानले जात आहे.
या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेटशिवाय संदेश पोहोचवण्याची क्षमता. मोबाईल टॉवरमार्फत थेट प्रसारित होणारे हे संदेश नेटवर्क जाम असतानाही प्राप्त होतात. विशेष म्हणजे, फोन सायलेंट किंवा ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडमध्ये असला तरीही हा इशारा मोठ्या आवाजात व कंपनासह वाजतो, ज्यामुळे नागरिकांचे तात्काळ लक्ष वेधले जाते.
तसेच, विशिष्ट भौगोलिक क्षेत्रासाठीच अलर्ट पाठवण्याची सोय असल्यामुळे संभाव्य धोक्याच्या भागातील नागरिकांना अचूक सूचना देता येतात. विविध प्रादेशिक भाषांमध्ये संदेश पाठवण्याची सुविधा असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही ही माहिती सहज समजणार आहे.
भूकंप, त्सुनामी, वीज पडणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त गॅस गळती किंवा रासायनिक दुर्घटना अशा मानवनिर्मित संकटांच्या वेळीही ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर, ही यंत्रणा देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत काही सेकंदांत इशारे पोहोचवू शकेल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
सरकारच्या या उपक्रमामुळे आपत्तीपूर्व तयारी आणि प्रतिसाद व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


