नवी दिल्ली वृत्तसंस्था
महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला चटका दिला असून, १ मे २०२६ पासून व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींमध्ये तब्बल १००० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांचा धुरळा शांत होताच सरकारी तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतल्याने व्यापारी व सेवा क्षेत्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशातील प्रमुख महानगरांसह अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता ३,००० चा टप्पा ओलांडून गेली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महानगरांमध्ये दरवाढीचा मोठा फटका
सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ९९३ ने वाढून ३,०७१.५० वर पोहोचली आहे. घरगुती सिलिंडर मात्र पूर्वीप्रमाणेच ९१३ दराने उपलब्ध आहे.
आर्थिक राजधानी मुंबईतही ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. येथे व्यावसायिक सिलिंडरचा दर २,०३१ वरून थेट ३,०२४ पर्यंत वाढला आहे. घरगुती सिलिंडरचा दर मात्र ९१२.५० वर स्थिर आहे.
कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडर २,२०८ वरून वाढून ३,२०२ वर पोहोचला आहे. जयपूरमध्ये हा दर ३,०९९ तर चेन्नईमध्ये ३,२३७ इतका झाला आहे. या सर्व शहरांमध्ये जवळपास ९९० ते १००० दरम्यान वाढ नोंदवली गेली आहे.
राज्यनिहाय दरांमध्ये तफावत
या दरवाढीमध्ये राज्यनिहाय फरक दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये वाढ जवळपास १००० पर्यंत असताना, उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये ती तुलनेने कमी म्हणजेच सुमारे ३०० इतकी आहे. त्यामुळे देशभरात एलपीजी दरांमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायावर परिणाम
व्यावसायिक गॅस सिलिंडर महागल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसायावर थेट परिणाम होणार आहे. लग्नसराईच्या हंगामात ही दरवाढ झाल्याने जेवणावळींचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, बाहेर जेवणे सर्वसामान्यांसाठी आणखी महाग होण्याची चिन्हे आहेत.
सर्वसामान्यांना दिलासा, पण तात्पुरता?
घरगुती गॅस सिलिंडरचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले असले तरी, भविष्यात त्यातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महागाईचा ताण पुढील काळात आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत, व्यावसायिक एलपीजीच्या दरवाढीने महागाईच्या आगीत पुन्हा तेल ओतले असून, त्याचे पडसाद लवकरच सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर उमटणार आहेत.


