रणजित मस्के,प्रतिनिधी
मुंबई : कुलाबा येथील काळा घोडा परिसरात पोलिसांनी कारवाई करत 24 लाख रुपये किमतीचा 480 ग्रॅम चरस जप्त केला असून एका इसमाला अटक केली आहे. ही कारवाई 27 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास के. दुभाष मार्गावरील ओरिकोन हाऊसजवळ करण्यात आली.
अकलेश रामचंद्र पटेल (वय 49) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20, 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्तीवर असलेल्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून 24 लाख रुपये किमतीचा 480 ग्रॅम चरस, 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल, 500 रुपये रोख रक्कम तसेच 60 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 24 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोरे करत आहेत. कारवाई पथकात पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोरे, पोलीस हवालदार चौधरी, पोलीस शिपाई बाराईत, हडवळे, भोये यांचा समावेश होता.


