मुंबई प्रतिनिधी
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार असून इयत्ता बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर होणार आहे, तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. यंदा प्रथमच गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र एकाच पानावर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो आणि QR कोडही असणार आहे.
इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान पार पडली होती, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलनही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्णत्वाकडे पोहोचली आहे.
बनावटगिरीला लगाम
दहावी-बारावी उत्तीर्ण न झालेल्या काहीजणांकडून बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका व प्रमाणपत्रे तयार करण्याचे प्रकार समोर येत होते. या पार्श्वभूमीवर मंडळाने कडक पावले उचलत नवे सुरक्षा फीचर्स लागू केले आहेत. यापुढे प्रत्येक गुणपत्रिकेवर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार असून QR कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांना आळा बसणार, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
छपाईला सुरुवात
सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्यानंतर आता गुणपत्रिकांच्या छपाईचे काम सुरू करण्यात आले आहे. निकाल लागल्यानंतर साधारणतः एक महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत.
१७ मेपासून अकरावी प्रवेश
दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच, म्हणजे १७ मेपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुणपत्रिकेच्या आधारे पसंतीच्या महाविद्यालयांचे पर्याय भरता येणार आहेत.
गतवर्षीपासून अकरावी प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवला जात असून, ‘डमी अॅडमिशन’ आणि केवळ कोचिंग क्लासेसकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा यामागील उद्देश आहे. यंदाही ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
बारावी निकाल : ५ मे
दहावी निकाल : १५ मेपूर्वी
गुणपत्रिका : फोटो व QR कोडसह
अकरावी प्रवेश नोंदणी : १७ मेपासून
निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पुढील शैक्षणिक टप्प्यासाठीची धावपळही लवकरच सुरू होणार आहे.


