मुंबई, प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व परिसरातील नाल्यात सापडलेल्या कुजलेल्या महिलेच्या मृतदेहाचा गुंता उलगडण्यात अंधेरी पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्याच भावाने आपल्या ८० वर्षीय बहिणीचा खून केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला व त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील एका नाल्यात साफसफाईदरम्यान कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाल्याने पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवून तपास सुरू केला.
दरम्यान, मृतदेहावरील कपड्यांच्या आधारे पोलिसांनी गेल्या काही महिन्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा आढावा घेतला असता, जानेवारी महिन्यात सहार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीशी साधर्म्य आढळले. त्यानुसार मृत महिलेची ओळख जेमे सिक्यूअरा अशी पटली. विशेष म्हणजे, तिच्या बेपत्तेची तक्रार तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोहेलो यानेच नोंदवली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी जोसेफ कोहेलो (६३) व त्याची पत्नी मारिया कोहेलो यांची चौकशी केली असता त्यांच्या वर्तनात विसंगती आढळून आली. अधिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मरोळ येथील ओमनगर परिसरात राहणाऱ्या जोसेफचा काही दिवसांपूर्वी बहिणीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादात त्याने बहिणीला जोराचा धक्का दिल्याने त्या खाली पडून जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेल्या जोसेफने पत्नीच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत तो नाल्यात फेकून दिला.
या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, खुनामागील नेमके कारण व इतर बाबींचा अधिक तपास सुरू आहे.


