नवी दिल्ली :
देशभरातील वाहनचालकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. टोल प्लाझांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा, वाद आणि वेळेचा अपव्यय आता इतिहासजमा होणार आहे. केंद्र सरकार लवकरच अशी अत्याधुनिक टोल प्रणाली लागू करणार आहे, ज्यामध्ये वाहन न थांबवता थेट टोल कपात होणार आहे. यामुळे प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि त्रासमुक्त होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लॉजिस्टिक्स पॉवर समिट अँड अवॉर्ड्स 2026’मध्ये ही महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, डिसेंबर 2026 पर्यंत देशातील अनेक राष्ट्रीय महामार्गांवर ‘अडथळामुक्त टोल प्रणाली’ अडथळा (बॅरिअर) नसलेली टोल वसुली प्रणाली, लागू करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
कशी काम करणार ही नवी प्रणाली?
या नव्या यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) कॅमेरे वाहनांची नंबर प्लेट वाचतील आणि RFID-आधारित FASTag प्रणालीद्वारे संबंधित बँक खात्यातून टोल आपोआप वसूल केला जाईल.
यामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबण्याची अजिबात गरज भासणार नाही.
नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहनमालकाला ई-नोटीस पाठवली जाईल. वेळेत शुल्क न भरल्यास फास्टॅग निलंबित करण्यासह दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते.
लॉजिस्टिक्स खर्चात होणार मोठी बचत
गडकरी म्हणाले की, देशातील लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यासाठी वेगवान आणि कार्यक्षम रस्ते नेटवर्क अत्यंत आवश्यक आहे. सध्या भारताचा लॉजिस्टिक्स खर्च सुमारे 16 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
तुलनेत अमेरिका आणि युरोपमध्ये हा खर्च सुमारे 12 टक्के, तर चीनमध्ये 8 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आहे.
नवीन टोल प्रणालीमुळे वेळेची बचत, इंधनाची बचत आणि वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योग-व्यवसायालाही मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणपूरक इंधनाकडेही लक्ष
यावेळी गडकरी यांनी देशाच्या ऊर्जा गरजांवरही भाष्य केले. भारत सध्या आपल्या तेलाच्या सुमारे 87 टक्के गरजा आयातीद्वारे भागवतो, ज्यावर दरवर्षी सुमारे 22 लाख कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे पर्यायी इंधन आणि जैवइंधनाचा वापर वाढवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील स्वच्छ आणि टिकाऊ इंधन ठरू शकते, मात्र ते सर्वसामान्यांसाठी परवडणारे होण्यासाठी त्याचा खर्च कमी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
एकंदरीत, AI-आधारित टोल प्रणालीमुळे ‘थांबा आणि जा’ ही जुनी पद्धत संपुष्टात येणार असून ‘न थांबता प्रवास’ ही नवी संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. यामुळे देशातील महामार्ग प्रवास अधिक स्मार्ट, जलद आणि आधुनिक होण्याची दिशा स्पष्ट झाली आहे.


