अमरावती प्रतिनिधी
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला दिलेल्या भेटीनंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी तीव्र शब्दांत टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावर आता गवई कुटुंबीयांसह राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
श्याम मानवांची टीका नेमकी काय?
अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना श्याम मानव यांनी म्हटले की, “भूषण गवई हे स्वतःला आंबेडकरी विचारांचे मानतात. मात्र ते जर धीरेंद्र शास्त्री यांच्या पाया पडत असतील, तर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.” त्यांच्या या वक्तव्याने आंबेडकरी वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
गवई बंधूंचे प्रत्युत्तर; थेट आव्हान
श्याम मानव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भूषण गवई यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी म्हटले, “समाजात राहणारा प्रत्येक आंबेडकरी नेता कधी ना कधी मंदिर, चर्च किंवा मशिदीत गेलेलाच आहे. मित्रांच्या आग्रहाखातरही अशा ठिकाणी जावे लागते.”
यावेळी त्यांनी थेट श्याम मानव यांना आव्हान देत म्हटले, “भूषणजींना नंतर रोखा, आधी मला रोखा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी एकटा, निशस्त्र येईन. तुम्ही जर एका बापाचे असाल तर माझं आव्हान स्वीकारा.” त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फडणवीसांचा टोला
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “श्याम मानव कोण आहेत हे ठरवणारे? त्यांना हा अधिकार कोणी दिला? ते काही सर्टिफिकेट वाटणारे नाहीत. अलीकडे ते केवळ प्रसिद्धीसाठी अशी विधानं करत आहेत,” असा टोला फडणवीसांनी लगावला.
राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा
या संपूर्ण प्रकरणामुळे धार्मिक श्रद्धा, आंबेडकरी विचार आणि सार्वजनिक व्यक्तींची वैयक्तिक भूमिका यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला जात असताना, दुसरीकडे विचारसरणीशी प्रामाणिक राहण्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सध्या हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, पुढील काही दिवसांत यावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.


