प्रतिनिधी | स्वप्नील गाडे
मुंबई : नागपाडा येथील ७८ वर्षीय मोहम्मद इक्बाल सलिया यांच्या हत्येचा गुंता सोडवण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. १९९७ मधील कुप्रसिद्ध गँगस्टर सादिक कालिया आणि २००२ मधील आरिफ कालिया यांच्या एन्काउंटरचा बदला घेण्यासाठीच त्यांच्या पुतण्याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-३ ने तांत्रिक तपासाच्या जोरावर नागपूरच्या बडा ताजबाग परिसरातून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
२० एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी नागपाडा परिसरात मोहम्मद इक्बाल सलिया यांची त्यांच्या राहत्या घरी चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. आरोपी अत्यंत सराईत असल्याने त्यांनी हत्येनंतर आपले मोबाईल फोन बंद केले होते आणि सातत्याने वास्तव्याचे ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होते. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून आरोपी नागपूरमध्ये असल्याची खात्रीलायक माहिती मिळवली. २४ एप्रिल रोजी पथकाने नागपुरात धडक देऊन आरोपींना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, अटकेत असलेला २९ वर्षीय मुख्य आरोपी हा पोलीस चकमकीत ठार झालेला गँगस्टर सादिक कालिया आणि आरिफ कालिया यांचा पुतण्या आहे. आपले दोन्ही काका पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले जाण्यास मृत इक्बाल सलिया यांची खबऱ्या म्हणून असलेली भूमिका कारणीभूत होती, असा संशय आरोपीच्या मनात होता. याच जुन्या वैमनस्यातून आणि रागातून त्याने आपल्या २५ वर्षीय मित्राच्या मदतीने सलिया यांची हत्या केली.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घाटकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालांडे, पोलीस हवालदार विनोद परब, पोलीस हवालदार रविंद्र देवार्डे, पोलीस हवालदार अशोक पाटील, पोलीस हवालदार वासुदेव परब, पोलीस हवालदार वैभव गिरकर, पोलीस शिपाई विकास चव्हाण आणि पोलीस शिपाई मारुती खेडकर या पथकाने पार पाडली.


