नंदुरबार प्रतिनिधी
धानोरा – नंदुरबार मार्गावर गुरुवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेषतः मृतांपैकी एका तरुणाचा अवघ्या दहा दिवसांवर विवाह ठरलेला असल्याची बाब समोर आल्याने या घटनेला अधिकच हृदयद्रावक वळण मिळाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोय फाटा ते वेळावद फाटा दरम्यान सकाळी सुमारे दहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा झायलो (GJ-16-BB-1552) या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (GJ-05-BR-0452) जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की मोटारसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रोहित आप्पा भिल (२२, रा. शिंदे, ता. नंदुरबार) आणि साजन संजय भिल (१८, रा. करजई, ता. शहादा) यांचा मृत्यू झाला.
या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे रोहित भिल याचा विवाह अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला होता. तो आपल्या मित्रासह नातेवाईकांना लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी निघाला असताना हा अपघात घडला. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच आलेल्या या दुर्दैवी वार्तेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या अपघातासाठी रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना कोणतेही सूचनाफलक, दिशादर्शक चिन्हे किंवा सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी हा मार्ग अपघातप्रवण बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाला आग लावली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


