कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहरानजीकच्या एका गावात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात एका महिलेला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिस सुत्रानुसार मिळालेली माहिती, पीडित महिला आर्थिक अडचणीत असताना आरोपीने तिला मदतीच्या नावाखाली पैसे दिले होते. मात्र, त्यानंतर तो सतत व्याजाच्या रकमेची मागणी करत तिच्यावर दबाव टाकू लागला. परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने पैशांच्या मोबदल्यात तिच्याकडून शरीरसंबंधांची मागणी केली आणि तिला त्यासाठी भाग पाडल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने संबंधित महिलेला एका हॉटेलमध्ये नेऊन तिचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले. या माध्यमातून ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आल्याचेही समोर आले आहे. यामुळे पीडितेला मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या जावयालाही आरोपीने मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व प्रकारामुळे संबंधित गावासह संपूर्ण कोल्हापूर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी संशयित अमित सावंत याच्याविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा सावकारी पद्धतीच्या आडून होणाऱ्या शोषणाचा मुद्दा समोर आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.


