कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गाव परिसरात खंडणीसाठी अपहरण करून व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवूनही अपहरणकर्त्यांनी संबंधिताचा जीव घेतल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे मृत व्यावसायिकाचे नाव असून त्यांचा मृतदेह जयसिंगपूरजवळील शेरी मळा परिसरातील शेतात आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी भरतेश यांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
अपहरणानंतर काही वेळातच आरोपींनी भरतेश यांच्या मोबाईलवरून त्यांच्या चुलत भावाला संपर्क साधत ठरावीक ठिकाणी रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर व त्याचे दोन मित्र दिलेल्या सूचनांनुसार विविध ठिकाणी फिरत राहिले. मात्र, अपहरणकर्त्यांनी वारंवार लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकल्याचे समोर आले आहे. काही काळानंतर संबंधित मोबाईल क्रमांक बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला.
दरम्यान, काही तासांतच भरतेश यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली. त्यांचा मृतदेह शेतात आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात धाव घेत निषेध व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अपहरणाची माहिती मिळूनही सुरुवातीला केवळ ‘बेपत्ता’ अशी नोंद करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी पोलिसांकडे जाब विचारला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सकाळी पोलीस निरीक्षक गोरे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून तपासाला वेग दिला.
अपहरणकर्त्यांनी केलेल्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून त्याआधारे तपास सुरू आहे. तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित गुन्हा उघडकीस आणून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, खंडणीची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शवूनही व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


