मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असतानाच गृहखात्यात सोमवारी मोठे फेरबदल करण्यात आले. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये अनेक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या (SP) बदलीचा समावेश असून, काही ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॅबिनेट बैठकीच्या आसपास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, आठवड्याच्या सुरुवातीलाच गृहखात्यातील या मोठ्या फेरबदलामुळे प्रशासनात हालचाल वाढली आहे.
बदल्यांची यादी (क्रमवारीनुसार)
अ.क्र.अधिकारी नाव विद्यमान पदस्थापना बदलीनंतरची पदस्थापना
१) तुषार दोषी पोलीस अधीक्षक, सातारा पोलीस अधीक्षक, सांगली
२) निखिल पिंगळे पोलीस उप आयुक्त, पुणेपोलीस अधीक्षक, सातारा
३) संदीप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली पोलीस आयुक्त (सुरक्षा), राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे
४) योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (अतिरिक्त जबाबदारी)
५) निलोत्पल पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
६) एम. रमेश अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोलीपोलीस अधीक्षक, गडचिरोली
७) महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
८) श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे पोलीस अधीक्षक, जळगाव
९) राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, पुणे पोलीस अधीक्षक, वाशीम
तुषार दोषी यांच्या बदलीकडे लक्ष
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तुषार दोषी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात काही वादग्रस्त घटना घडल्याने ते चर्चेत आले होते. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यासंदर्भात त्यांच्यावर कारवाईची मागणीही झाली होती. तसेच फलटण येथील आत्महत्येच्या प्रकरणातही त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका झाली होती.
कोल्हापूरमध्ये नवे नेतृत्व
कोल्हापूर जिल्ह्यातही पोलीस प्रशासनात बदल करण्यात आला असून, निलोत्पल यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. गडचिरोलीत कार्यरत असलेले निलोत्पल आता कोल्हापूरमध्ये पदभार स्वीकारणार आहेत.
बदल्यानंतर प्रशासनात हालचाल
या बदल्यांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनात नव्याने समन्वय साधण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विशेषतः नक्षलग्रस्त गडचिरोली, तसेच संवेदनशील जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असेल.
गृहखात्याच्या या सलग बदल्यांमुळे प्रशासन अधिक गतिमान करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.


