देगलूर प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात वाढत्या उष्णतेचा भीषण परिणाम समोर आला असून कावळगाव येथील शेतकरी गंगाधर पोचिराम सोनाकांबळे (वय ५२) यांचा रविवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास शेतात काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
माहितीनुसार, सोनाकांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ झाली असताना ते शेतातच काम करत होते. याच दरम्यान त्यांना चक्कर येऊन प्रकृती अचानक खालावली. स्थानिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र उष्माघाताचा तीव्र फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा विभागात उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. परिणामी, दुपारच्या सुमारास बाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. तरीही उपजीविकेच्या गरजेमुळे शेतकरी कडक उन्हात काम करत असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि उष्णतेपासून बचावाचे उपाय अवलंबावेत, असे आवाहन तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणीही स्थानिक पातळीवरून जोर धरत आहे.
या घटनेमुळे देगलूर तालुक्यात शोककळा पसरली असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


