
आज (30 सप्टेंबर) बारामतीमध्ये दिवसाढवळ्या तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्याच्या झालेल्या खुनाने बारामती हादरून गेली आहे. बारामतीमधील प्रसिद्ध अशा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याने हा खून केल्याची माहिती समोर येत आहे.या दोन विद्यार्थ्यामध्ये कडाक्याचे भांडण झालं होतं आणि भांडणाचं रूपांतर खून होण्यापर्यंत गेल्याची माहिती समोर आली आहे.हल्ला करण्यात आला तेव्हा दोघेजण होते. यामधील एक जण पळून गेला असून एक जण पोलिसांना सापडला. दरम्यान, हा खून चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूलाच झाला.कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही
दिवसाढवळ्या खून होत असताना तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये वर्दळ असताना सुद्धा विद्यार्थ्याच्या मदतीला कोणी सुद्धा धावून आलं नाही. त्यामुळे माणुसकीच हरवून गेली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला अनेक विद्यार्थ्यांची, शिक्षकांची तसेच सुरक्षारक्षक सुद्धा देखील ये जा असते. मात्र, त्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत असताना त्यामध्ये कोणीही मध्यस्थी केली नाही किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
त्यामुळे पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता बारामतीमध्ये सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँगने प्रचंड अशी दहशत माजवली आहे. पुणे पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला असला, तरी कोयता गँगला कोणताही पायबंद बसलेला नाही. आता हेच कोयते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.