प्रतिनिधी | स्वप्नील गाडे
मुंबई: मुंबईच्या बांद्रा पूर्व येथील कल्पतरू स्पार्कल परिसरात झालेल्या अभिनवकुमार याच्या निर्घृण हत्येचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना यश आले आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी मुख्य आरोपीला ६० तासांच्या आत पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
गेल्या १३ एप्रिल रोजी दुपारी २:२० च्या सुमारास अभिनवकुमार याला काही अज्ञात इसमांनी गाठून त्याच्या मानेवर चाकूने वार केले होते. या हल्ल्यात अभिनवचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ह्त्येमागील कारण: प्रेमप्रकरण आणि लग्नाचा अडथळा
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मृत अभिनव याचे प्रितीकुमारी नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रितीकुमारीच्या घरच्यांनी तिचे लग्न निरजकुमार बिलास चौधरी (३१) याच्याशी ठरवले होते. प्रितीकुमारीने या लग्नास विरोध केल्याने निरजकुमारच्या मनात अभिनवबद्दल प्रचंड राग होता. याच रागातून निरजकुमारने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांचा थरारक पाठलाग
आरोपी निरजकुमार हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता. तो सतत आपले लोकेशन बदलत होता. त्याने मुंबई ते कोलकाता प्रवासादरम्यान पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ३ ते ४ वेळा ट्रेन बदलल्या. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांचे एक पथक नागपूरला तर दुसरे कोलकात्याला रवाना झाले. अखेर आरोपी कोलकाता येथून विमानाने दिल्लीला पळण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी CISF च्या मदतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेतले.
यांनी केली यशस्वी कामगिरी:
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजीतसिंग दहिया, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ८) मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त (खेरवाडी विभाग) संजय गायकवाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार:
या तपासात पोलीस निरीक्षक सविता माळी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल आटोळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप लोंढे, पोलीस उपनिरीक्षक चेतन पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय घोसाळकर, पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस शिपाई गायकवाड, पोलीस शिपाई अमित शिंदे आणि पोलीस शिपाई प्रसाद पडवळकर या सर्वांचा सहभाग होता.


