मुंबई प्रतिनिधी
राज्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी दिलासा ठरणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यातील ८६९ रुग्णांना आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान सुमारे ८ कोटी १० लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांतून मदत न मिळालेल्या रुग्णांसाठी हा निधी ‘जीवनदायी’ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या निधीच्या कार्यपद्धतीत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना, अर्ज प्रक्रियेचे पूर्णपणे पेपरलेस रूपांतर, तसेच अर्जांच्या तातडीने निपटाऱ्यासाठी विकसित केलेली यंत्रणा यामुळे मदत वितरणाची गती लक्षणीयरीत्या वाढली आहे. परिणामी, पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळू लागले असून प्रक्रियेत पारदर्शकताही वाढली आहे.
याशिवाय, सामंजस्य करार (एमओयू) आणि ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढवण्यात आला आहे. धर्मादाय रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील दाते यांचे सहकार्य मिळत असल्याने निधीची उपलब्धता वाढून अधिकाधिक रुग्णांना मदत मिळत आहे.
२० गंभीर आजारांसाठी सहाय्य
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वयोगटातील बालकांसाठी), हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, गुडघा व हिप रिप्लेसमेंट, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिएशन उपचार, मेंदूविकार, डायलिसिस, अपघातग्रस्त रुग्ण, नवजात शिशुंचे आजार, भाजलेले (बर्न) रुग्ण तसेच विद्युत अपघातग्रस्त अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
बालकांच्या कर्करोग उपचारासाठी विशेष पुढाकार
बालकांच्या कर्करोग उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होणार असून आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या बालकांना दर्जेदार उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांना मदत
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्यापैकी मुंबई उपनगर जिल्ह्याचा वाटा लक्षणीय असून ८६९ रुग्णांना सुमारे ८.१० कोटींची मदत वितरित झाली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.


