पुणे प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज मंगळवारी (१४ एप्रिल) शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम, मिरवणुका आणि अभिवादन सोहळे आयोजित करण्यात आल्याने पुणे शहरातील मध्यवर्ती तसेच उपनगरी भागातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लष्कर भाग, दांडेकर पूल तसेच विश्रांतवाडी येथे विशेषतः गर्दीची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांची अंमलबजावणी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहर व उपनगरांतून मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होत असल्याने या परिसरातील वाहतूक पूर्णतः वळविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना संयम बाळगून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मध्यवर्ती भागात बदल
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली असून वाहनचालकांना आरटीओ चौक व जहाँगीर रुग्णालयमार्गे प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आरटीओ चौकातून मालधक्क्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ताडीवाला रस्ता हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
मुख्य टपाल कार्यालय (जीपीओ) परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक किराड चौक आणि नेहरू मेमोरियल चौकमार्गे वळविण्यात आली आहे. पुणे स्थानकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांनाही बंदी घालण्यात आली असून त्यांना पर्यायी मार्गाने पाठवण्यात येत आहे.
सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूकही वळविण्यात आली आहे. या भागातील वाहनचालकांनी नरपतगिरी चौक, १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक आणि कुंभारवेस मार्गाचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आपत्कालीन सेवांसाठी विशेष व्यवस्था
ससून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिका व इतर वाहनांसाठी शवागाराजवळील प्रवेशद्वार खुला ठेवण्यात आला आहे. तसेच मालधक्का चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक परिसर आणि फोटो झिंको प्रेस उपरस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगवर बंदी घालण्यात आली आहे.
लष्कर व पारंपरिक मार्गांवर निर्बंध
लष्कर भागातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या भागातील वाहतूकही वळविण्यात आली आहे. बाजीराव रस्ता, गणेश रस्ता आणि लालबहाद्दुर शास्त्री रस्ता या प्रमुख मार्गांवर सायंकाळी मिरवणुकांमुळे वाहतूक बदल लागू राहणार आहेत.
पार्किंगची सोय
कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीओ चौकाजवळील एसएसपीएमएस प्रशालेचे मैदान, पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ आणि ससून कॉलनी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दांडेकर पूल व विश्रांतवाडी येथे बदल
दांडेकर पूल परिसरात स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक सारसबाग, ना. सी. फडके चौक, मांगीरबाबा चौक, जुना दत्तवाडी मार्गे वळविण्यात आली आहे. सिंहगड रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना दत्तवाडीमार्गे पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश आहेत.
विश्रांतवाडीतील मुख्य चौकात विविध कार्यक्रमांमुळे आळंदी रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले असून आळंदी, दिघी आणि धानोरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
गर्दीचा ताण लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


