आटपाडी प्रतिनिधी
लग्नाच्या आमिषाने युवकांना जाळ्यात ओढून विवाहानंतर दागिने व रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या टोळीचा आटपाडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, बनावट वधूसह दोन एजंटांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तरुणीने यापूर्वी तीन विवाह करून अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.
देशमुखवाडी येथील नवनाथ देशमुख याच्याशी २४ मार्च रोजी वर्षा संभाजी शेवाळे ऊर्फ बेगम दस्तगीर शेख (वय २४, रा. विजयनगर, कराड) हिचे लग्न एजंट सचिन बाबर याने लावून दिले. या व्यवहारासाठी २१ हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. विवाहानंतर काही दिवसांतच संबंधित तरुणीने घरातील दागिने व रोख रक्कम घेऊन पलायन केले. याप्रकरणी नवनाथ देशमुख यांनी आटपाडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
तपासादरम्यान ही एक संघटित टोळी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी वर्षा ऊर्फ बेगमसह सचिन हणमंत बाबर (देवापूर, ता. माण), अश्विनी संदीप जाधव (सातारा), संतोष सदाशिव कुलकर्णी (कडेगाव), गणपत गोविंद जाधव (शाळगाव) आणि शकुंतला गरुड (कडेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहेत.
दरम्यान, संबंधित तरुणीने यापूर्वी तीन विवाह केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पहिला विवाह युवराज शेवाळे याच्याशी झाला होता. त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी गणेश मोरे (रा. वेताळवाडी, ता. पाटण) याच्याशी विवाह करून १९ ऑक्टोबरला ती तेथूनही पसार झाली होती. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात आहे. पुढे साताऱ्यातील साथीदारांच्या मदतीने गणेश पोळ याच्याशी नोटरी विवाह लावून देत तेथेदेखील फसवणूक केल्याचे उघड झाले.
पाचव्या लग्नाचा डाव उधळला
देशमुखवाडी येथील घटनेनंतर संबंधित तरुणी भादोले येथे पोहोचली होती. अंकुश पाटील यांच्या ओळखीचा फायदा घेत तिने त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि १० एप्रिल रोजी विवाह करण्याचा बेत आखला होता. मात्र, पोलिसांनी वेळेत कारवाई करत हा डाव उधळला. कारवाईदरम्यान सोन्याचे मंगळसूत्र, पैंजण तसेच १ लाख १० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
‘फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे’
लग्नासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करून एजंटांच्या माध्यमातून अशा प्रकारची फसवणूक वाढत असल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. या टोळीमार्फत फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन आटपाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी केले आहे.


