मुंबई प्रतिनिधी
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात अचानक ‘महापूर’ आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये रस्ते अक्षरशः नदीसारखे वाहताना दिसत होते, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. रखरखत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक उभ्या राहिलेल्या या पाण्याच्या तडाख्यामुळे नागरिक चक्रावून गेले.
ही घटना वांद्रे पश्चिम येथील गजबजलेल्या परिसरात घडली. विशेषतः लकी हॉटेल समोरच्या रस्त्यावर काही क्षणांतच पाण्याचा प्रचंड साठा निर्माण झाला. सुरुवातीला मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असा समज नागरिकांचा झाला; मात्र प्रत्यक्षात हा प्रकार पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे घडल्याचे स्पष्ट झाले.
मुख्य जलवाहिनी फुटली, प्रचंड दाबामुळे पाण्याचा स्फोट
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, संबंधित भागातील मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी प्रचंड दाबाने बाहेर पडले. या जलवाहिनीतील पाण्याचा प्रेशर अत्यंत जास्त असल्याने काही मिनिटांतच संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. पाण्याचा वेग इतका तीव्र होता की ते दूरवरच्या भागात पसरले आणि रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले.
दुकानांत घुसलं पाणी, नागरिकांची धावपळ
या अनपेक्षित पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेक दुकाने पाण्याखाली गेली. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही काळ परिसरात गोंधळ उडाला.
वाहतूक कोलमडली, रस्त्यावर वाहनांच्या रांगा
पाण्याच्या साठ्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. महत्त्वाच्या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. काही वाहनचालकांना वाहन रस्त्यातच सोडून सुरक्षित ठिकाणी हलावे लागले. परिणामी, या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.
प्रशासनाची धावपळ; परिस्थितीवर नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे पथक आणि वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. पाण्याचा प्रवाह थांबवल्यानंतर साचलेले पाणी हळूहळू ओसरू लागले आणि काही तासांत परिस्थिती नियंत्रणात आली. प्रशासनाच्या समन्वयामुळे वाहतूकही पुन्हा सुरळीत करण्यात यश आले.
व्हायरल व्हिडिओंनी वाढवली भीती
दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, अनेकांना मुंबईत अवकाळी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा भास झाला. मात्र प्रत्यक्षात ही घटना जलवाहिनी फुटल्यामुळे घडल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मुंबईसारख्या अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील भागात मुख्य जलवाहिनी फुटण्याची घटना घडल्याने पायाभूत सुविधांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


