पाटणा:
देशाच्या सुरक्षेला हादरवून सोडणारा एक अत्यंत धक्कादायक कट बिहारमधून उघडकीस आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य आरोपीने ‘अमेरिकेची गुप्तचर संस्था’ (CIA) यांच्याशी थेट संपर्क साधत मोठ्या रकमेच्या बदल्यात हल्ला करण्याची तयारी दर्शवली होती.
बक्सर जिल्ह्यातील सिमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत मुख्य आरोपी अमन तिवारी याच्यासह आणखी दोघांना अटक केली. बक्सरचे पोलीस अधीक्षक शुभम आर्य यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती देताना सांगितले की, पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची अत्यंत संवेदनशील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि संशयितांवर लक्ष ठेवत छापा टाकला.
तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, अमन तिवारी याने CIAला पाठवलेल्या संदेशात स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, “मला २२ दिवस द्या, मी काम पूर्ण करतो.” या संदेशातून त्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा मानस व्यक्त केला होता. या कामाच्या बदल्यात त्याने मोठ्या आर्थिक मोबदल्याची मागणी केली होती. पैशांच्या हव्यासातून आणि इंटरनेटच्या प्रभावातून त्याने हा धोकादायक कट रचल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली असून, त्याच माध्यमातून CIAशी संपर्क साधण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कटामागे आणखी कोणाचे हात आहेत का, आरोपींचे काही आंतरराष्ट्रीय संपर्क आहेत का, तसेच या कारस्थानात स्थानिक की बाहेरील व्यक्ती सहभागी होत्या का, याचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून, प्रत्येक दुव्याची बारकाईने छाननी केली जात आहे.
मुख्य आरोपी अमन तिवारी हा बक्सर जिल्ह्यातील आशा पडरी गावचा रहिवासी असून, त्याची कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी साधारण आहे. त्याचे वडील गणेश तिवारी हे पुजारी आहेत. अमनचे शिक्षणही स्थानिक पातळीवर झाले असून, तो इंटरनेटवर अधिक सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, याआधीही त्याने कोलकाता विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती आणि त्या प्रकरणात त्याला अटकही झाली होती. त्यामुळे त्याचा गुन्हेगारी इतिहास पोलिसांसाठी तपासात महत्त्वाचा ठरत आहे.
या घटनेमुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाढत चाललेले सायबर-धोके आणि अतिरेकी प्रवृत्तींचा प्रभाव यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वावर हल्ल्याचा कट रचण्याइतका गंभीर प्रकार उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
एकीकडे बक्सर पोलिसांच्या तातडीच्या आणि दक्ष कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या कटांचे मूळ शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त करणे हेच आता यंत्रणांसमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.


