वृत्तसंस्था:
जगभरातील अब्जावधी वापरकर्त्यांचा विश्वास संपादन केलेल्या WhatsApp या लोकप्रिय मेसेजिंग अॅपच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला आहे. टेस्ला व एक्सचे प्रमुख Elon Musk यांनी व्हॉट्सअॅपच्या गोपनीयतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत “या प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवता येत नाही” असे स्पष्टपणे म्हटल्याने टेक विश्वात खळबळ उडाली आहे.
मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टला रीट्विट करत हा दावा केला. संबंधित पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’बाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी आपल्या पोस्टमधून व्हॉट्सअॅपवर अविश्वास व्यक्त केला आणि ‘X Chat’ हा पर्याय अधिक सुरक्षित असल्याचे सूचित केले.
Can’t trust WhatsApp https://t.co/Ts55gVXqkD
— Elon Musk (@elonmusk) April 9, 2026
या वादाची मूळ पार्श्वभूमी एका खटल्याशी संबंधित आहे. या खटल्यात असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की, “बुलेटप्रूफ एंड-टू-एंड एन्क्रिप्शन”चा दावा करणाऱ्या व्हॉट्सअॅपने काही परिस्थितींमध्ये युजर्सचे प्रायव्हेट मेसेजेस थर्ड पार्टीकडे पोहोचू दिले. विशेषतः Accenture या सल्लागार कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना डेटा अॅक्सेस मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांमुळे युजर्सच्या गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, Meta ने या सर्व आरोपांचे ठाम खंडन केले आहे. कंपनीने स्पष्ट केले की, व्हॉट्सअॅप गेल्या दहा वर्षांपासून Signal Protocol चा वापर करून एंड-टू-एंड एन्क्रिप्शन प्रदान करत आहे. त्यामुळे प्रेषक आणि प्राप्तकर्ता यांच्याशिवाय इतर कोणालाही संदेश वाचता येत नाहीत. खटल्यातील आरोप “पूर्णपणे खोटे आणि हास्यास्पद” असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
याच दरम्यान, Bloomberg च्या एका अहवालाने या वादाला आणखी हवा दिली आहे. या अहवालानुसार, मेटाच्या काही माजी कंत्राटदारांनी चौकशीदरम्यान असा दावा केला की कंटेंट मॉडरेशन प्रक्रियेदरम्यान काही कर्मचाऱ्यांना संदेशांशी संबंधित माहितीपर्यंत प्रवेश मिळत होता.
तज्ज्ञांच्या मते, व्हॉट्सअॅपचे एन्क्रिप्शन तांत्रिकदृष्ट्या मजबूत असले तरी “मेटाडेटा” म्हणजेच कोणाशी, केव्हा आणि किती वेळ संवाद झाला यासारखी माहिती कंपनीकडून गोळा केली जाते. तसेच क्लाउड बॅकअप सुरक्षित नसल्यास प्रायव्हसीचा धोका वाढू शकतो, असेही ते सांगतात.
एकूणच, व्हॉट्सअॅप पूर्णपणे असुरक्षित असल्याचे ठोस पुरावे समोर आलेले नसले तरी प्रायव्हसीबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. टेक कंपन्यांमधील स्पर्धा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर युजर्सनी सतर्क राहण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.


