रत्नागिरी प्रतिनिधी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटात बुधवारी रात्री एक थरारक दरोड्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ‘पांडुरंग’ असे लिहिलेली थार आणि ‘भारत सरकार’ असा लोगो असलेली इनोव्हा या दोन गाड्यांमधून आलेल्या टोळीने म्हैस घेऊन जाणाऱ्या एका व्यावसायिकाला अडवून त्याला जबरदस्तीने गाडीत कोंबले, मारहाण केली आणि रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, देवरुख पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या काही तासांत या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे.
रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील दख्खन परिसरात हा प्रकार घडला. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील वेतोशी येथून बोलेरो गाडीतून म्हैस घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते आंबा घाटातील दख्खन परिसरात पोहोचले असता अचानक दोन गाड्या त्यांच्या गाडीसमोर आडव्या आल्या.
त्यातील एक थार गाडीवर ‘पांडुरंग’ असे लिहिलेले होते, तर दुसरी इनोव्हा गाडी ‘भारत सरकार’ असा लोगो लावलेली होती. या दोन्ही गाड्यांमधून आठ जण खाली उतरले आणि त्यांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी दळवी यांना गाडीतून खाली ओढून काढले, त्यांना बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले.
त्यानंतर आरोपींनी दळवी यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे त्यांनी दळवी यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर “जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या तीन पोलिसांच्या पथकाने आंबा घाट परिसरात शोधमोहीम सुरू केली. घाटातील दुर्गम भाग पिंजून काढताना पोलिसांना एका आडवाटेला ‘पांडुरंग कृपा’ असे लिहिलेली गाडी दिसली. त्या गाडीच्या जवळच काही संशयित आरोपी बसून दारू पित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
अवघ्या तीन जणांच्या पोलिस पथकाने क्षणाचाही विलंब न करता धाडसी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले, तर दोन जण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या प्रकरणी फिर्यादी प्रथमेश दळवी यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि लांजा पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली.
तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी फरहान रशिद मुल्ला (वय ४२, रा. कोकण नगर), प्रथमेश सचिन भाटकर (वय २४, रा. गोळप), सर्वेश सुभाष किर (वय २२, रा. सोमेश्वर), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय २६, रा. कुवारबांव) आणि भूषण बिपेंद्र सावंत (वय २६, रा. मिऱ्या) या पाच आरोपींना रत्नागिरी परिसरातून ताब्यात घेत अटक केली.
या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना देवरुख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून या धाडसी कारवाईबद्दल रत्नागिरी पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


