प्रतिनिधी | रणजित मस्के
सातारा तालुका पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवत शेंद्रे परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे हेरॉईन आणि कारसह एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस हवालदार राजू शिखरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शेंद्रे ते बोगदा मार्गावर पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणारी टोयोटा इटिओस कार (क्र. MH 47 K 1619) अडवण्यात आली. सुरुवातीला गाडीतील इसमांनी तपासणीस विरोध करत उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता अमली पदार्थांचा साठा उघड झाला. यामध्ये ४ लाख ८० हजार रुपयांचे ब्राऊनिश हेरॉईन, ४ लाखांची कार आणि २० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, प्रभारी अधिकारी निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव आणि पोलीस हवालदार राजू शिखरे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव करत असून, तस्करीचे धागेदोरे कोठे जोडलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.


