सातारा प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात ‘संकटमोचक’ म्हणून ओळख असलेले जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी अचानक साताऱ्याचा दौरा करून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची घेतलेली ‘खास भेट’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. साताऱ्यातील ‘जलमंदिर पॅलेस’ येथे दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पुण्यातील अधिकृत काम आटोपल्यानंतर महाजन यांचा ताफा नियोजित मार्ग बदलत अचानक साताऱ्याकडे वळल्याने या भेटीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. पुण्याहून थेट साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी उदयनराजेंच्या निवासस्थानी भेट देत दिलखुलास संवाद साधला. यावेळी कल्पनाराजे भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली.
भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री महाजन यांनी या भेटीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न फेटाळून लावला. “पुण्यात आल्यानंतर राजेंशी फोनवर संपर्क झाला. ते साताऱ्यात असल्याचे समजल्यावर सहज भेटण्यासाठी आलो. आमचे पारिवारिक संबंध आहेत. ही पूर्णतः सदिच्छा भेट असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व काही अलबेल आहे,” असे सूचक विधान करत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
दुसरीकडे, उदयनराजे भोसले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास मिश्किल शैलीत उत्तर देत चर्चेला वेगळेच वळण दिले. “आमच्यात कॉलेजच्या जुन्या आठवणींवर चर्चा झाली. त्या नेमक्या कोणत्या, हे विचारू नका; आणि मी सांगणारही नाही,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना खळखळून हसवले, मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना अधिक खतपाणी मिळाले.
दरम्यान, महाजन यांनी या भेटीचे छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत सातारा जिल्ह्यासह राज्यातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे नमूद केले आहे. तरीही, दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या या अचानक भेटीमागे नेमका कोणता ‘राजकीय अर्थ’ दडलेला आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
एकीकडे ‘सदिच्छा भेट’ असा अधिकृत दावा, तर दुसरीकडे मिश्किल संकेत, या दोन्ही गोष्टींमुळे महाजन-उदयनराजे भेटीभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले असून येत्या काळात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


