प्रतिनिधी | रणजित मस्के
धुळे: शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठ्या शिताफीने अटक केली आहे. धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्रांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना एक गुप्त माहिती मिळाली होती की, मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल ‘साई किशन’ जवळील सर्विस रोडवर एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असून त्याच्याकडे शस्त्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगावबारी परिसरात पोलिसांनी तातडीने सापळा रचला. यावेळी राहुल पांडुरंग पाटील (वय २९, रा. वरवाडे शिरपूर) हा तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा मॅग्झीनसह देशी बनावटीचा कट्टा (पिस्टल) आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी राहुल पाटील याच्याविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो हा कट्टा कोणाकडून घेऊन आला आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
सदर कामगिरीमध्ये श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक), अजय देवरे (अप्पर पोलीस अधीक्षक), श्रीराम पवार (पोलीस निरीक्षक), चेतन मुंढे (पोउनि), पवन गवळी, आरीफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकुर आणि मयुर पाटील या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता.


