सातारा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचा ४७ वा स्थापना दिन साताऱ्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पक्षाच्या राष्ट्रवादी विचारधारेचा पुनरुच्चार केला.
६ एप्रिल १९८० रोजी जनता पक्षातून बाहेर पडलेल्या जनसंघ परंपरेतील नेत्यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध तोडण्याच्या मागणीला विरोध करत अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या भूमिकेवर ठाम राहून नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतरच्या ४६ वर्षांच्या प्रवासात पक्षाने अनेक चढ-उतार अनुभवत देशाच्या राजकारणात भक्कम स्थान निर्माण केले.
१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र पुढील काळात पक्षाने सातत्याने वाढ साधत १९८९ मध्ये ८५ जागांपर्यंत मजल मारली. १९९८ आणि १९९९ मध्ये विविध प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने केंद्रात सत्ता स्थापन करत पक्षाने राष्ट्रीय राजकारणात आपली ताकद दाखवून दिली. २०१४ नंतर केंद्रात सलग सत्ता मिळवत भाजपाने देशाच्या राजकीय पटावर आपले वर्चस्व मजबूत केले आहे.
महाराष्ट्रातही जनसंघ ते भाजपा असा संघर्षमय प्रवास राहिला. १९८० मध्ये केवळ १४ जागांपासून सुरू झालेली वाटचाल १९९५ मध्ये शिवसेनेसोबतच्या युतीमुळे सत्तेपर्यंत पोहोचली. विविध सामाजिक घटकांना जोडत पक्षाने राज्यातही आपला विस्तार वाढवला.
कार्यक्रमात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या मंत्राने प्रेरित होऊन देशसेवेत पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, माजी आमदार मदनदादा भोसले, लोकसभा संयोजक सुनील कटाकर, माजी आ. दिलीप येळगावकर, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पंचायत समिती सभापती महेश गाडे, नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


