नांदेड प्रतिनिधी
नांदेड शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खुनांच्या मालिकेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच सोमवारी पहाटे आणखी एक थरारक घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी खंजरने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे नांदेड शहर पुन्हा एकदा हादरून गेले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव सोनू कल्याणकर (वय ३३) असे असून तो शिवसेना शिंदे गटाचा युवा शहर प्रमुख म्हणून कार्यरत होता. शहरातील गजबजलेल्या आणि क्लासेस हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पहाटेच्या सुमारास रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसमोरच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामराव पवार मार्ग परिसरात राहणारा सोनू कल्याणकर सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होता. त्याच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवून असलेल्या तिघा ते चौघा हल्लेखोरांनी त्याला श्रीनगर भागातील कुमार ड्रेसेस दुकानासमोर गाठले. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कोणतीही संधी न देता खंजरने त्याच्यावर सपासप वार केले.
भर रस्त्यावर घडलेल्या या अचानक हल्ल्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. काही क्षणांतच सोनू कल्याणकर गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला आयटीआय चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्या शरीरावर तब्बल १७ पेक्षा अधिक वार केले होते. तीक्ष्ण हत्यारांच्या घावांमुळे त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे नांदेड शहरात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री शहरातील कॅनॉल रोड परिसरात वर्चस्वाच्या वादातून तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत मुरमुरा गल्लीत तलवार आणि खंजर हल्ल्यात रणजितसिंह तबेलेवाले या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ सोमवारी पहाटे पुन्हा एका हत्येने शहरातील गुन्हेगारीचा आलेख चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, तसेच पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात काही महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत.
तीन वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला
सोनू कल्याणकरवर यापूर्वीही प्राणघातक हल्ला झाला होता. सुमारे तीन वर्षांपूर्वी तो एका वॉटर प्लांटवर बसला असताना रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता. त्या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला होता. गोळीबार करणारा गोलू मंगनाळे सध्या तुरुंगात आहे. या ताज्या हत्येमागे त्याचा किंवा त्याच्या टोळीचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
राजकारणात सक्रिय असलेला चेहरा
सोनू कल्याणकर हा मागील अनेक वर्षांपासून नांदेड शहरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. काही दिवसांपूर्वीच त्याने भाजपला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेना युवा शहर प्रमुख म्हणून तो कार्यरत होता. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी त्याने पक्षाकडून उमेदवारीही मागितली होती.
पूर्ववैमनस्याची शक्यता
दरम्यान, सोनू कल्याणकरवर यापूर्वी काही गुन्हेही दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही हत्या पूर्ववैमनस्यातून किंवा गँगवॉरमधून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र या प्रकरणामागील नेमके कारण काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
सलग तीन दिवसांत घडलेल्या पाच हत्यांच्या घटनांमुळे नांदेड शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून शहरात शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


